शैक्षणिक गुणवत्तावृद्धी वर्ष सन २०२२-२३ अंतर्गत नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत..
विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन हानी भरून काढण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेले KRA टप्प्या-टप्प्याने साध्य करण्यासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करणे महत्त्वाचे ठरत आहे. या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्तेचा निश्चित टप्पा संपादित करण्याच्या हेतूने शैक्षणिक गुणवत्तावृद्धी वर्ष सन २०२२-२३ अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्याबाबत शासनामार्फत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.
प्रस्तावना -
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष सन
२०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत राज्यामध्ये नियमितपणे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही प्राधान्याने विचारात घेवून दैनंदिन अध्ययन
अध्यापनाव्यतिरिक्त घरी राहून विविध माध्यमाद्वारे शिक्षण सुरू ठेवण्याचे
सर्वोतोपरी प्रयत्न राज्य शासनामार्फत करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी हे आपल्या
देशाचं भवितव्य, राष्ट्राची संपत्ती व उद्याची उमेद आहेत.
त्यांच्या निकोप वाढीसाठी त्यांना शिक्षणासाठी उत्तम व पोषक वातावरण देणे गरजेचे
आहे.
राज्यात शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये नियमितपणे
शाळा सुरू झालेल्या आहेत. आगामी वर्षात टप्प्या-टप्प्याने नियोजनबद्ध पद्धतीने
शैक्षणिक उपक्रम राबविणे आणि त्याआधारे राज्याची शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी करणे
आवश्यक ठरत आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय यंत्रणेतील सर्व घटकांच्या
मदतीने राज्यात शैक्षणिक प्रगती साध्य करण्याच्या हेतूने शैक्षणिक
गुणवत्तावृद्धी वर्ष सन २०२२-२३ अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम
राबवविणे आणि अपेक्षित ध्येयपूर्तीसाठी मागदर्शक सूचना निर्गमित करणे आवश्यक आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही शिक्षकांनी शिक्षण विद्यार्थ्यांचा
दारी पोहोचवण्याचे महान कार्य केले. ही यशोगाथा पुढे सुरू रहावी यासाठी यंदाचे
शैक्षणिक वर्ष "शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष" म्हणून साजरे
करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :
कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे मागील दोन
वर्षामध्ये विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन हानी भरून काढण्यासाठी आणि शैक्षणिक
गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेले KRA टप्प्या-टप्प्याने
साध्य करण्यासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक उपक्रमांचे उत्कृष्ट
नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करणे महत्त्वाचे ठरत आहे. या अनुषंगाने शैक्षणिक
गुणवत्तेचा निश्चित टप्पा संपादित करण्याच्या हेतूने शैक्षणिक गुणवत्तावृद्धी
वर्ष सन २०२२-२३ अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणेसाठी मार्गदर्शक
सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
1) शैक्षणिक गुणवत्तावृद्धी वर्ष सन २०२२-२३
अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम :
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये शाळाबाह्य मुलांना
शाळेत दाखल करणे, सर्व विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत
क्षमता विकसित करणे, विद्यार्थ्याची अध्ययन वृद्धी
करण्यासाठी राज्यस्तरावरून शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणीसाठी
मार्गदर्शन करणे यावर भर देण्यात येणार आहे. या शैक्षणिक उपक्रमांच्या
अंमलबजावणीसाठी समग्र शिक्षा अंतर्गत राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे या कार्यालयास आवश्यक निधी
उपलब्ध करून देण्यात येईल. या शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
वेळोवेळी मार्गदर्शन, आढावा, त्रयस्थ
संस्थेद्वारे उपक्रमाचे मूल्यमापन याद्वारे राज्यात शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी
प्रेरक वातावरण निर्मिती करून यंत्रणेतील सर्व घटकांच्या मदतीने शैक्षणिक
गुणवत्तावृद्धी वर्ष सन २०२२-२३ अंतर्गत पुढीलप्रमाणे महत्त्वपूर्ण आणि विशेष
शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
२.१) झीरो ड्रॉप आऊट मिशन :
कोविड- १९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर
झालेले असून ३ ते १८ वयोगटातील असंख्य बालके शाळाबाह्य झाल्याचे दिसून येत आहे.
अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी आणि शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी मिशन झिरो
ड्रॉप आऊट राबविण्यात यावे.
राज्यस्तरावरून मार्च २०२१ व त्या पूर्वी वेळोवेळी
शाळाबाहा मुलांसाठी केलेल्या सर्वेक्षणामधून अपेक्षित माहिती प्राप्त झालेली असून
१०० टक्के बालके शाळेत दाखल झालेली दिसून येत नाहीत किंवा काही बालके प्राथमिक
शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच शाळा सोडताना दिसून येत आहेत. कोरोना महामारी च्या
प्रादुर्भावानंतर प्रथमच सर्वेक्षण हाती घेण्यात येत असून सर्व दाखलपात्र
विद्यार्थाची १०० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. यासाठी बालकांना शाळाबाह्य
होण्यापासून रोखण्यासाठी मिशन झिरो ड्रॉप आऊट दि. ५ जुलै ते २० जुलै २०२२ या
कालावधीत व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार यावे.
२. २) पुनर्रचित सेतू अभ्यास :
विद्यार्थ्यांचा मागील दोन
वर्षातील झालेला अध्ययन हास (learning loss) भरून काढण्यासाठी
गतवर्षी राज्यस्तरावरून इयत्तानिहाय व विषयनिहाय सेतू कोर्सची निर्मिती करण्यात
आलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण ४५ दिवस आणि तीन चाचण्या अश्या
स्वरुपाच्या सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी दि. ०१ जुलै ते १५ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत करण्यात आलेली होती. तसेच राज्यस्तरावरून केलेल्या
संशोधन अभ्यासाद्वारे सेतू अभ्यासक्रमाची सकारात्मक परिणामकारकता दिसून आलेली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या आधारे राज्यातील
विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती मधील संपादणूक कमी असल्याचे दिसून आले आहे. या
धर्तीवर राज्यातील विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन हास भरून काढण्यासाठी आणि अध्ययन
निष्पत्ती मधील संपादणूक विकसनासाठी पुनर्रचित सेतू अभ्यास राबविण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शालेय कामकाजाचे एकूण तीस दिवस व दोन चाचण्या अश्या
स्वरुपाचा सेतू अभ्यास परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करून देण्यात आलेला आहे. सामान्य विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्रे आणि गणित या विषयासाठी कृती आधारित सेतु अभ्यास विकसित
करण्यात आलेला असून या आधारे विद्यार्थ्यांनी महत्वाच्या अध्ययन निष्पत्ती संपादित
करण्यावर भर देण्यात यावा. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांची संपादणूक वृद्धी साध्य करण्यास मदत होणार आहे.
२.३) शाळापूर्व तयारी मेळावे :
मागील दोन वर्षापासून कोविड-
१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अंगणवाड्या / बालवर्ग बंद आहेत. त्यामुळे तीन ते
सहा वयोगटातील बालकांना शाळापूर्व तयारीच्या दृष्टीने कृती करण्याच्या संधी फारशा
मिळू शकलेल्या नाहीत. परिणामी बालकांची शाळापूर्व तयारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे
बालकांची शाळापूर्व तयारी करून घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता
राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका
च्या सर्व शाळांमध्ये जून, २०२२ मध्ये इयत्ता पहिलीत
प्रवेशित होणा-या बालकांची शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच स्वयंसेवक यांच्या मदतीने शाळापूर्व तयारी करणे, इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखलपात्र बालकांची १००% पटनोंदणी होण्याच्या
दृष्टीने पूर्वतयारी करणे आणि इयत्ता पहिलीच्या वर्गात बालकांचे सहज संक्रमण घडून
आणण्यास मदत करणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शाळापूर्व तयारी मेळावे आयोजित
करण्यात येत आहेत. पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक यांची शाळेतले
पहिले पाऊल पुस्तिका, कृतिपत्रिका व आयडिया कार्ड या
साहित्याच्या आधारे बालकांची शाळापूर्व तयारी करून घेण्याची कार्यवाही शाळास्तरावर
करण्यात यावी. सदर उपक्रमांतर्गत शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास),
बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास,
भाषा विकास, गणनपूर्व तयारी, पालकांना मार्गदर्शन या द्वारे बालकांची शाळापूर्व तयारी करण्यात यावी.
२.४) पायाभूत भाषिक साक्षरता व गणितीय कौशल्य विकसन
कार्यक्रम (निपुण भारत मिशन):-
निपुण भारत (National Initiative for
Proficiency in reading with Understanding and Numeracy) अभियान
अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (Foundational Literacy and
Numeracy) मोहीम देशातील प्रत्येक मूल शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पर्यंत
इयत्ता तिसरीच्या अखेरीस आवश्यक पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करेल
याबाबतची खात्री करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. यासोबतच जी मुले इयत्ता चौथी
आणि पाचवी या वर्गात आहेत आणि ज्यांनी सदर पायाभूत कौशल्ये प्राप्त केलेली नाहीत,
त्यांना आवश्यक क्षमता प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक शिक्षक
मार्गदर्शन आणि सहाय्य, सहाध्यायीकडून मदत आणि वयानुरूप व
पूरक श्रेणीबद्ध अध्ययन साहित्य पुरविण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील पूर्व व
प्राथमिक स्तर ते इयत्ता पाचवी वर्गापर्यंतच्या १००% विद्यार्थ्याच्या पायाभूत
साक्षरता आणि संख्याज्ञान क्षमता विकसित होण्यासाठी शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम,
विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य, शिक्षक
अध्यापन मार्गदर्शिका इ. साहित्याची निर्मिती करण्यात यावी. त्यामध्ये प्रत्येक
मुलाने भाषा आणि गणित या विषयाच्या खालील पायाभूत क्षमता संपादित करण्यावर भर
देण्यात यावा. कुटुंब व परिसरातील भाषा वापरातून मौखिक भाषेचा विकास
शाळापूर्वस्तरावरील प्रारंभिक भाषा आणि साक्षरता यांच्या विकासासाठी शालेय भाषेचे
योग्य अभिव्यक्तीसह प्रकटीकरण आणि त्यासोबत चांगले श्रवण व आकलन कौशल्य, मुद्रित आणि ध्वनीविषयक जागरूकता विकसित करणे महत्वाचे आहे. राज्यातील
पूर्व प्राथमिक ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या १०० % विद्यार्थ्यांच्या पायाभूत भाषिक
साक्षरता व गणितिय कौशल्य व क्षमता विकसित होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक
सूचनेनुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी
अध्ययन साहित्य इ. ची निर्मिती करण्यात यावी. तसेच शिक्षक, पालक,
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्यासाठी वेळोवेळी उपक्रम विषयक
मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात. त्यामध्ये प्रत्येक मुलाने भाषा आणि
गणित या विषयाच्या पायाभूत क्षमता संपादित करण्यावर भर देण्यात यावा.
२.५) इयत्ता पहिली विद्याप्रवेश : शाळापूर्व
तयारी कार्यक्रम अंमलबजावणी:
इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व
विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाशी जुळवून घेणे सहजसुलभ व्हावे व त्यांच्या
वयानुरूप आणि विकासाच्या दृष्टीने योग्य प्रारंभिक शिक्षण अनुभव देणे, यासाठी विविध खेळ, कृती उपक्रमाचे आयोजन शाळांमध्ये
होणे आवश्यक आहे. यासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी
निपुण भारत अभियान अंतर्गत सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात सुरुवातीस तीन महिने
कालावधी असणारा खेळ व कृती यांवर आधारीत विद्याप्रवेश: शाळापूर्व तयारी कार्यक्रम
सर्व शाळांमध्ये राबविण्यात यावा. यासाठी शिक्षक मार्गदर्शिका व विद्यार्थी
कृतिपुस्तिका हे साहित्य विकसित करण्यात यावे व शिक्षकांचे उद्बोधनही घेण्यात
यावे. या कार्यक्रमाची राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात
येणार यावी.
२.६) नियमित मूल्यमापन योजना :
• सद्यस्थितीत राज्यात विद्यार्थीनिहाय, विषयनिहाय संपादणूक माहिती उपलब्ध होत नसल्याने विषयनिहाय प्रशिक्षणाचे
आयोजन, विद्यार्थी मागे राहत असलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय
शैक्षणिक साहित्याची निर्मिती, शैक्षणिक धोरणात्मक निर्णय
यासाठी अडचण निर्माण होत आहेत. प्रत्येक विषयाच्या अध्ययन निष्पत्ती विशिष्ट
पाठ्यघटकाचे अध्ययन-अध्यापन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना किती प्रमाणात साध्य
झाल्या यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नियमितपणे मागोवा घेण्याच्या आणि गरजेवर
आधारित अध्ययनास मदत करण्याच्या उद्देशाने नियतकालिक (पाक्षिक) मुल्यांकन चाचणी (PAT)
सुरू करण्यात याव्यात. सदर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची ठराविक
कालावधीने चाचणी घेण्यात यावी व त्या आधारे विद्यार्थ्याने कोणत्या अध्ययन
निष्पत्ती साध्य केल्या व कोणत्या अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यामध्ये अडचणी आल्या
याची सद्यस्थिती घेऊन या माहितीच्या आधारे शिक्षक, पालक
यांना मुलाची अध्ययनातील प्रगती व शिकण्यातील अडचणीचा विचार करून
वर्गाध्यापनामध्ये अध्ययन अनुभवांची रचना करण्यास यावी. या उपक्रमाच्या प्रभावी
अंमलबजावणीसाठी शिक्षण यंत्रणेतील सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे शैक्षणिक
गुणवत्ता वृद्धीसाठी शैक्षणिक सहाय्य घेण्यात यावे.
२.७) आनंददायी अभ्यासक्रम :
सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण
तणाव,
उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे
जावे लागत आहे. त्यामुळे अनेक हिंसात्मक घटना, आत्महत्येचे
प्रसंग अवतीभवती घडताना दिसतात. तसेच कोरोना संकटामुळे सुद्धा गेल्या काही वर्षात
मानसिक स्वास्थ्य टिकविणे हे विद्याथ्र्यापुढे मोठे आव्हान आहे. म्हणून तर्कसंगत
विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती,
साहस, लवचिकता, वैज्ञानिक
चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक
मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा
महत्त्वाचा उद्देश आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी
अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिक्षणातील अभिरुची वाढविणे, गळतीचे प्रमाण कमी करणे, विद्यार्थ्यांचे मानसिक
स्वास्थ्य उत्तम राखणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक, संभाषण, समस्या
निराकरण तसेच ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य विकसित करणे इ. उद्दिष्टे
साध्य करण्यासाठी आनंददायी कृतीचे नियोजनाबाबत राज्यस्तरावरून मार्गदर्शक सूचना
निर्गमित कराव्यात, यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःमधील
आनंदाला समजणे, तो अनुभवणे व तो आनंद मिळवता येणे यासाठी या
पाठ्यक्रमात सजगता, कथा (गोष्ट), कृती,
अभिव्यक्ती या चार घटकांचा समावेश करण्यात यावा. या घटकांचे
साप्ताहिक नियोजन सोमवार सजगता, मंगळवार व बुधवार कथा
(गोष्ट), गुरुवार व शुक्रवार कृती. शनिवार- अभिव्यक्ती असे
स्वरूप असावे. सदर अभ्यासक्रमात विद्यार्थ्याचे कोणतेही औपचारिक लेखी मूल्यमापन न
करता अनौपचारिकरित्या मूल्यांकन करावे.
२.८) शिक्षक विदेश आणि राज्य अभ्यास दौरा -
राज्यातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी
देशाबाहेरील शैक्षणिकदृष्ट्या नवोपक्रमशील व प्रगत देश आणि भारतातील शैक्षणिक
दृष्ट्या अग्रेसर राज्यांमधील उपक्रमशील /प्रयोगशील शाळा, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण कार्यक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शैक्षणिक प्रयोगांचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास
करणे या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध राज्य व देशांचा अभ्यास दौरा
ही योजना राबविण्यात यावी. शाळा प्रगत करण्यामध्ये आणि शालेय गुणवत्ता विकसनासाठी
उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या शिक्षक आणि अधिकारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक
आणि अधिकारी यांची विहित पद्धतीने निवड करून प्रगत राज्य आणि विदेशातील
नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतींचा अभ्यास करण्याची संधी देण्यात यावी.
२.९)
पूरक अध्ययन साहित्याचा वापर :
विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी छापील स्वरुपात पूरक
अध्ययन साहित्य राज्य स्तरावरून विकसित करण्यात यावे. यामध्ये वयानुरूप प्रवेशित
मुलांसाठी विद्यार्थी मित्र पुस्तिका, इयत्ता पहिली ते
पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा व गणित विषयासाठी कार्यपुस्तिका, विद्या प्रवेश शिक्षक मार्गदर्शिका व विद्यार्थी कृतिपुस्तिका, पहिले पाऊल पुस्तिका, कृतिपत्रिका व आयडिया कार्ड इ.
चा समावेश करण्यात यावा. या पूरक अध्ययन साहित्याच्या आधारे विद्यार्थ्यांचे
सातत्यपूर्ण अध्ययन आणि विषय निहाय अध्ययन निष्पत्ती संपादणूक विकसित होण्यास मदत
होईल.
२.१०) शाळा सुशोभिकरण, स्वच्छता व अध्ययन समृद्ध
शालेय परिसर :
सलग दोन वर्षाच्या कालावधीत नियमितपणे शाळा सुरु
झाल्या नसल्याने या वर्षी नियमितपणे वर्ग सुरु झाल्यानंतर शाळेमध्ये नव्याने
चैतन्य आणि आनंददायी वातावरण निर्माण व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याची
आवश्यकता आहे. घर आणि परिसरानंतर शाळेशी विद्यार्थ्यांची नाळ घट्टपणे जोडलेली
असते. आपल्या शाळेशी, वर्गाशी आपुलकी आणि जवळीक निर्माण
व्हावी या दृष्टीने विद्यार्थ्यांना गटानुसार शालेय भिंती वर्गकोपरे आणि इतर शालेय
परिसराची स्वच्छता आणि सुशोभिकरणाची जबाबदारी देणे यासारख्या उपक्रमांचे आयोजन
करण्यात यावे. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापन समिती
सदस्यांच्या मदतीने वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि शाळेचा इतर
परिसर हा विषयातील संकल्पनावर आधारित आकृत्या, चिन्हे,
संबोध दर्शविणाऱ्या बोलक्या भिंती, पोस्टर,
फलकलेखन करून सुशोभित करण्यात यावा. वर्गामध्ये आणि वर्गाबाहेर
विद्यार्थ्यांना अध्ययनाची संधी मिळावी या दृष्टीने नाविन्यपूर्ण व कलात्मक
उपक्रमांची आखणी करून अंमलबजावणी करावी.
२.११) Maharashtra
Young Leaders Aspiration Development Programme मिलाप :
आजच्या विद्यार्थ्यांपुढे भविष्यात येणारे
तंत्रज्ञानातील बदल. जागतिकीकरणाची अनिश्चितता यांना आत्मविश्वासाने सामोरे
जाण्यासाठी लागणारे २१ व्या शतकातील तंत्रज्ञान आणि जीवन कौशल्ये आत्मसात करणे
गरजेचे आहे. याच उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने Maharashtra Young Leaders
Aspiration Development Programme ( मिलाप) ही योजना भविष्याच सक्षम
नेतृत्व निर्माण करण्याचे दृष्टीने अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत शिक्षणाची
उद्योगाशी सांगड घालून विद्यार्थ्यांना Early Career Development' चे विविध पर्याय आणि उद्योजकतेच्या मानसिकतेचा विकास करण्याचे उपक्रम हाती
घेण्यात यावे.
२.१२) शिक्षण दूत :
शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेवून विविध स्पर्धा
परीक्षांमध्ये (UPSC / MPSC / NDA) यश संपादन करणारे
विद्यार्थी हेच दर्जेदार शिक्षण व्यवस्थेचे खरे दुत आहेत. असे गुणी विद्यार्थी
जिल्ह्याचे 'शिक्षण दूत' म्हणून काम
करतील. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात यावा..
३. सर्व शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात यावी.
३.१) आयुक्त (शिक्षण), पुणे हे या
उपक्रासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. या उपक्रमांतर्गत राबविण्यात येत
असलेल्या प्रत्येक उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना व कालबध्द
कार्यक्रम आयुक्त (शिक्षण) यांनी सर्व अंमलबजावणी यंत्रणांना निर्गमित कराव्या.
३.२) सर्व शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी
राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,
मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत करावी.
३.३) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विषय सहाय्यक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक व
उच्च माध्यमिक) शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेष विषय साधन व्यक्ती इ. पर्यवेक्षकीय यंत्रणांनी शैक्षणिक
गुणवत्तावृद्धी वर्ष सन २०२२-२३ अंतर्गत महत्त्वपूर्ण आणि विशेष शैक्षणिक उपक्रम
अंमलबजावणीसाठी आयुक्त (शिक्षण), राज्य प्रकल्प संचालक,
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परीषद्, मुंबई व
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे आदेशानुसार कार्यवाही करावी.
३.४) या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी
अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेस वेळेत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही राज्य प्रकल्प
संचालक,
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
यांनी करावी.
३.५) पर्यवेक्षकीय यंत्रणेतील सर्व घटक यांनी
शैक्षणिक उपक्रम अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावरून निर्देशित केलेल्या सूचनेनुसार
पुढाकार,
सक्रीय सहभाग आणि समन्वय साधून जिल्हास्तरावर उपक्रम अंमलबजावणीचे
नियोजन करावे.
(३.६) शैक्षणिक उपक्रम अंमलबजावणीसाठी शाळा आणि
शिक्षक यांना आवश्यक ते शैक्षणिक सहकार्य करावे. तसेच प्रेरणादायी शैक्षणिक
वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करावेत.
३.७) शैक्षणिक उपक्रम अंमलबजावणीनंतर उपक्रमांच्या
मूल्यमापनासाठी राज्यस्तरावरून निर्देशिक केलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी आणि
उत्तम कामगिरी करणाऱ्या शाळा, केंद्र, तालुका
आणि जिल्हा यांची माहिती संकलित करावी.
३.८) उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी
यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यासाठी माहिती संकलित करावी. त्यानुसार
राज्यस्तरावरून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल.
३.९) राज्यस्तरावरून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक
सूचनेनुसार गुणवत्ता वृद्धीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासोबतच जिल्ह्यातील इतर
नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम अंमलबजावणीच्या यशोगाथा यांचे संकलन करावे.
0 टिप्पण्या